Wednesday, October 19, 2011

अमेरिकेचे 'जॉब्स' आणि जॉब्स

- अमित रहाळकर, अमेरिका 
स्टीव जॉब्स काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी जगभरातील तरण्या ताठ्यांना तर सोडाच पण प्रत्येक शिशु विहरालासुद्धा 


आता पर्यंत ज्ञात झाली असेल! तसेच अमेरिकेतील जॉब्स मार्केट मधील जॉब्स गेल्याची बातमी सुद्धा संपूर्ण जगाला ठाऊक आहे! 

गेल्या दशकात अमेरिकेबाहेरील जीवन प्रणालीचे ही केंद्रस्थान म्हणजे कम्प्युटर्स होते आहे हे तर आपण सगळेच अनुभवतो आहोत. दिवसेंदिवसस गतिमान होत जाणार्‍या या जीवनात फूरसत मिळाली की विरंगुळा म्हणून चित्रपट बघणे किंवा आप्तेष्टांशी वरचे वर फोनवर बोलणे हा सुद्धा आज या जीवनाचा एक पैलू झाला आहे. बाजारात कम्प्युटर्सची, चित्रपटांची आणि फोनची रेलचेल आहे. पण या तिन्ही गोष्टी बनवणारी एकच कंपनी आहे. आणि ती म्हणजे एप्पल. या तिन्ही माध्यमात शिरून जॉब्स महाशयांनी आपल्या उत्तम उपकरणांद्वारे आपल्या व्यवहारी आणि खाजगी आयुष्यात नुसता शिरकावच नाही केला तर गेल्या काही वर्षात ऐस पैस फत्कल मारुन बसले ! आणि म्हणूनच त्यांच्या निधनाचे पडसाद जगभर उमटल्याचे नवल नाही. टेक्नॉलॉजीच्या मंचावर पुढला अंक कुठला येणार आहे हे अचूक ओळखून तो अंक उपभोगण्यास त्यांनी आए-म्याक, आय-पॉड, आय-फोन, आणि आय-पॅड सारखी उपकरणे बनवली. मोहन रूप, उत्कृष्ट दर्जा, भरोसेमन्द, अग्रेसर इंजिनियरिंगनी ओतप्रोत, आणि महाग असलेल्या या उपकरणांनी लोकांना भुरळ पाडली. इतकी की त्यातील त्रूटीकडे दुर्लक्ष करून, खिशाला चीमटा काढून, लोकांनी त्या गोष्टी विकत घेतल्या. 

अमेरिकेच्या दुसर्‍या जॉब्स , म्हणजे जॉब्स मार्केटमध्ये, अशाच काहीशा छटा आढळतात ! कंप्यूटर , फोन, चित्रपट अशा निर्मितीची क्षेत्रे तर सोडाच पण हे जॉब्स मार्केट बाकी अनेक व्यवसायक्षेत्रांमध्ये सुद्धा अग्रेसर आहे. मग ती गवत कापण्याशी निगडीत क्षेत्रे असोत किव्हा अवकाशात यंत्रे सोडणारी क्षेत्रे असोत. इंटरनेटवर हा जो तुम्ही लेख वाचता आहात त्या इंटरनेटची सर्वदूर पोचसुद्धा याच जॉब्स मार्केट मुळे शक्य झाली आहे ! तसेच बाकी अनेक क्षेत्रांच्या आघाडीवरील पुढील पाऊल ही इथेच टाकले जाते. अमेरिकेबाहेर सुद्धा शोध लागतात, लोक अंतराळात यंत्रे सोडतात , गाड्या बनवतात आणि चालवतातही. पण जसे एखादे गाणे आय-पॉड ऐकण्यात एक वेगळ्याच प्रतिष्ठेची आणि मौजेची बाब आहे, तसे अमेरिकेच्या जॉब्स मार्केटचा हिस्सा बनून त्याच गोष्टींच्या उत्पादनात किंवा उपभोगात काही वेगळीच मजा आहे. असा समजेचा पगडा तरी जगभर आहे ! म्हणूनच या जॉब्स मार्केट्सच्या निधनाच्या अफवा जगभर पसरतात आणि लोक भय विस्मितततेने त्या ऐकतात. 

व्यवहारी आयुष्यात स्टीव जॉब्सने काळजी घेतली की लोकांची नजर त्यांच्या पलीकडे जाऊ नये. बाहेर च्या जगावर स्टीव जॉब्स म्हणजे अॅप्पल कंपनी आणि अॅप्पल कंपनी म्हणजे स्टीव जॉब्स हे समीकरण त्यांनी बिंबवले. त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या खाली काम करणार्‍या लोकांकडून त्यांच्या बद्दल फारशी स्तुतीसुमने उधळलेली ऐकिवात नाहीत. तसेच त्यांच्या खाजगी जीवनातील ज्या काही गोष्टी ज्ञात आहेत त्या मेणबत्त्या जाळून एका संताच्याच्या निधनाला साजेसा शोक प्रगट करण्यायुक्त नक्कीच वाटत नाहीत. जसे की त्यांचा मित्र आणि धंद्यातील जोडीदाराला अटारी कंपनीने दिलेला ७५०० डॉलर्सचा बोनस फक्त ७०० डॉलर्सच मिळाला असे सांगून त्यातलाही निम्मा वाटा ढापणे. नंतर १९७८ साली लग्नाबाहेरील संबंधा पासून झालेल्या मुलीचा तब्बल २ वर्षे अस्वीकार करणे. वयाच्या २५ व्या वर्षी १०० मिलियन डॉलर्स कमावले असतांना किंवा निधना आधी त्यांच्या कडे ४ बिलियन डॉलर्स असतांना, सामाजिक कारणांसाठी बिल गेट्स सारखे पैसे देऊ करण्यास साफ नकार देणे. अशी गुण संपन्नता असलेल्याच्या जाणीवेनी की काय पण त्यांनी १९८० च्या दशका नंतर आपले खाजगी जीवन सदैव गुप्त राहील याची अतोनात काळजी घेतली. तरीही निधानानंतर लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या पैलूंकडे डोळेझाक करून जगभर हळहळ व्यक्त केली. अगदी आपल्या अण्णा हजारे यांनी स्टीव जॉब्सने त्यांच्या आंदोलनात मदत केल्याचे मत दिले. आता कोणी तरी महागडा आय-पॅड घेऊन अण्णाना दिला, आणि फेसबुक, ट्विटर वर्गैरे माध्यमातून पसरलेल्या बातम्या त्यांनी त्या आय-पॅडवर वाचल्या. यात स्टीव जॉब्सनी आंदोलनात कशी मदत केली याचे खुद्द जॉब्सना ही कोडे पडले असते तर नवल नव्हते! शेवटी काय तर दैनंदिन जीवनाशी निगडीत व उपयुक्त अशा अॅप्पलच्या उपकरणांच्या निर्मितीच्या तराजूतच लोकांनी स्टीव जॉब्स चे जीवन तोलले. आणि म्हणूनच त्यांच्या व्यावहारिक कर्माचे पारडे सदैव भारी राहीले. 

अमेरिकेच्या दूसर्‍या जॉब्स, म्हणजे जॉब्स मार्केट मधे, सुद्धा असे पैलू आढळून येतात! या जॉब्स मार्केट चे खाजगी जीवन लोभसवाणे नाही. त्याच्यात किती अनिश्चितता आहे व दसरा-दिवाळी विसरून लोकांना अहोरात्र काम काम करावयास कसे भाग पाडते हे त्याचा हिस्सा झाल्यावर जवळून अनुभवास मिळते . या जॉब्स मार्केटमधील वर्किंग अवर्स आज जगात सर्वात जास्त आहेत. जरी आठवड्यातील ५ दिवसच वर्किंग डेज़ समजल्या जातात, फक्त ४० तास आठवड्यात काम करणारी मंडळी कमीच आहेत. तसेच इथे जगातील सर्वात कमी पेड वेकेशन व पेड हॉलिडेज़चे प्रमाण आहे. आणि वरुन लोक त्याही सुट्ट्या पूर्ण संपवत नाहीत. खाजगी जीवनात त्यामुळे स्ट्रेसचे प्रमाण बरेच आहे आणि शारीरिक स्थूलता, मधुमेह, हृदयरोग अशा बराच आजारांनी लोकांना ग्रासला आहे. आणि तरी याकडे खुशाल दुर्लक्ष करून आपले देशवासीय तर सोडाच पण इतर राष्ट्रांमधले ही लोक एल-1, एच-1 वगैरे वीसांसाठी तडफड करतात ! त्याचे कारण म्हणजे या जॉब्स मार्केटच्या निर्मित्या. जी.ई., इंटेल, मायक्रोसॉफ्ट, वॉर्नर ब्रदर्स, गुगल, बोईंग, मोटोरोला, सिटी-बॅंक, फोर्ड अशा कंपन्या याच जॉब मार्केट्समधे जन्मल्या आहेत. आणि या कंपन्यांच्या विविध वस्तू आज जगभरातील लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या पैलूशी निगडीत झाल्या आहेत. 

स्टीव जॉब्स जसे मागील काही वर्षे कॅन्सर ने ग्रासित होते तसेच हे जॉब्स मार्केट ही गेले काहीं वर्षे रुग्ण शय्येवर खीळून आहे. पॅनक्रीयाजच्या ऑपरेशन नंतर व पुढे लिवरच्या ट्रान्सप्लँटच्या ऑपरेशन ने जशी स्टीव जॉब्सच्या आयुष्याची मशाल धगधगती ठेवली, तशीच क्वांटिटेटिव ईज़िंग , टार्प अशा विविध उपचारांनी अमेरिकेच्या सरकारने या जॉब्स मार्केटचा बेरोजगारीचा आकडा १० % च्या खाली ठेवून त्याला कसेबसे जीवंत ठेवले आहे. पण आता याहून खाली हा आकडा आणणे जरूरीचे झालेले आहे. पुढल्या वर्षीच्या निवडणुकीचे वारे वारे सुरू झाले आहेतच . म्हणून सगळ्यांच्या ध्यानी मनी हे जॉब्स मार्केट आहे पाहूनच ओबामा महाशयांनी गेल्या महिन्यात ४४७ बिलियन डॉलर्स च्या अजुन एक  इंजेक्शन  ची घोषणा केली होती. मात्र मागील बुधवार सेनेटमधे तो प्रस्ताव पराजीत झाला ही बाब चिंता जनक आहे. 

स्टीव जॉब्स ना तर कोणी काळाच्या पडद्यामागून आणू शकत नाहीं. पण त्यांनी 'थिंक डिफरेंट' या ब्रीद वाक्याच्या जोरावर अॅप्पल कंपनी ला मात्र काळाच्या सावटा खालून बाहेर आणले होते. तर अशी आशा करू या की तेच ब्रीद वाक्य जॉब्स मार्केट्स च्या पुनरुत्थाना साठी साठी ओबामा महाशयांना कामी येईल आणि जॉब्स आणि जॉब्स चिरायु राहतील !

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10365856.cms

Sunday, October 9, 2011

ग्रीस: दिवाळी की दिवाळे?

>> अमित रहाळकर अमेरिका 


भारतात दसरा"दिवाळीचे" वारे वाहता आहेत आणि युरोपात ग्रीसला "दिवाळे" घोषीत करू द्यावे की नाही अशा चर्चेचे वारे वाहताहेत. जर ग्रीसने खरेच दिवाळे घोषित केले तर मात्र होणार्‍या आर्थिक आतिष बाजीचे नुकसान पिढ्यन पिढ्या लक्ष्मी पूजने करून भारतालाच नाही तर अख्या जगाला भरून काढावे लागेल ... अशी भीती तरी दर्शवल्या जाते आहे ! आणि त्यात थोडे फार तथ्य ही आहे. 

३ ऑक्टोबर रोजी ग्रीसने घोषित केले की त्यांच्या बजेट मधील ७.६% कपातीचे लक्ष्य काही साध्य होणार नाही. या वर्षी तर सोडाच पण पुढील वर्षी सुद्धा तसे होणे शक्य नाही. आय.एम. एफ आणि युरोपियन फाइनान्शियल स्टेबिलिटी फेसिलिटी (ई.फ.एस.एफ. ) प्रोग्रॅम्सकडून जर ऑक्टोबर महिन्यात ८ बिलियन यूरो (एक बिलियन म्हणजे १०० करोड रुपये)चा आर्थिक मदतीचा पुढला हप्ता हवा असेल तर त्यांची अट होती की बजेटमध्ये कपात करून ती जीडीपी च्या ७.६% वर आणावी. 

तशी आय.एम.एफ आणि ई.फ.एस.एफकडे ही फारशी आर्थिक बारूद नाही. आय.एम. एफ चे एस.डी.आर (स्पेशल ड्रॉयिंग राइट्स) फक्त २५० बिलियन यूरोच्या आसपास आहेत. तर ई.फ.एस.एफकडे काही २५० बिलियन यूरो आहेत. ही पैशाची तरतूद सगळ्या यूरो झोन मधील १७ देशांसाठी आहे. म्हणजे त्यात ग्रीस शिवाय इटली स्पेनपोर्तुगाल अशी बाकीची आर्थिक भीक लागण्याच्या वाटेवर उभी असणारी मंडळी आली. आता बघा फक्त इटलीचे पब्लिक डेट २ ट्रिलियन(एक ट्रिलियन म्हणजे १ लाख करोड रुपये) यूरोच्या घरात आहे जे की ह्या यूरो झोनच्या संपूर्ण जीडीपी च्या तब्बल २०% मोडते! म्हणजे या मंडळींना ही वाचवायचे म्हणतले तर किमान २ट्रिलियन यूरो ते ४ट्रिलियन यूरोची निकड भासेल अशा चर्चा सुरू आहेत. ५०० बिलियन यूरोच्या भरोश्यावर ४ ट्रिलियन यूरो सोय करणे म्हणजे ८ पटिचे लिव्हरेज आले. लिव्हरेजची ही शीडी चढणार्‍याला काही अंतर नेते आणि मग तोंडावर पाडते याचा कोणाला विसर पडला असेल तर डूबलेल्या अमेरिकेच्या लेहमन बॅंक व बेयर स्टेर्न्ससारख्या बॅंक्काना विचारा. वरुन ही रक्कम उभी करण्यात त्या १७ देशांची सहमती होणे जरुरीचे आहे हे वेगळेच. ही सहमती होणे किती कठीण आहे हे कोणाला पाहीजे असेल तर त्याने आपल्या भारतातील राजकारणाचे अवलोकन करावे! 
३२ कोटी लोकसंख्या असलेल्या या यूरो झोनचा जीडीपी आहे ९.५ ट्रिलियन यूरोआणि त्यात जर्मनी आणि फ्रांसचा मिळून हिस्सा आहे निम्म्याच्या वर! म्हणजे कुठले ही इमर्जेन्सी लोन देणे आले तर जर्मनी आणि फ्रांस च्या शिवाय एक ही पाऊल पुढे टाकणे अशक्य. म्हणूनच बरीच मंडळी सारकोझी महाशय आणि मर्केल बाईंच्या दारावर पायर्‍या झिजवण्यात गुंतली आहेत! 

जर्मनीच्या जीडीपीचा भर निर्यातीवर आहे. चीन रशिया भारत जपान अमेरिका आणि यूरो झोनमधील बाकीचे देश म्हणजे जर्मनीचे ग्राहक. ह्या ग्राहकांची उन्नती (जीडीपीत वाढ) म्हणजे जर्मनीची उन्नती. मात्र यूरो झोनचा जीडीपी फक्त १.१% ने पुढल्या वर्षी वाढेल असे आय.एम.एफ चे भाकित आहे. इटलीचा जीडीपी तर फक्त ०.३% ने वाढेल असा अंदाज आहे. अमेरिकेचा जीडीपी सुद्धा फार तर १.८% ने वाढेल असे आय.एम.एफ म्हणते. त्यात चीन आणि भारतात इन्फ्लेशनला आळा घालण्यास व्याजात केलेली वाढ म्हणजे त्यांची ही जीडीपीपूर्वी सारखी जोमाने वाढण्याचे चिन्ह कमीच आहेत. मग जर्मनीला कष्टाने कमावलेला खिशातला पैसा देऊ करून उद्या काय खायचे असा प्रश्न पडत असेल तर नवल नाही. 

युरोपच्या आणिबाणीच्या परिस्थितीत अमेरिका मदतीस येते असे मागील शतकातला इतिहास तरी दर्शवतो. दुस-या महायुद्धाच्या पूर्तीनंतर अमेरिकेची आर्थिक मदत युरोपच्या आणि प्रमुखताः जर्मनीच्या उभारणीस कारणीभूत ठरली. अगदी पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकीकरणात सुधा अमेरिकेचा हातभार होता. मात्र सध्या अमेरिका आपल्याच डोईजड झालेल्या कर्जाखाली दबली आहे. गेल्या १० वर्षात अफगाणीस्तानइराक आणि इतक्यात लीबीया मधे सुरू असलेल्या युद्धांमधे गुंतली आहे. पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकांच्यामध्ये स्वत: भोवतीच गरगर फिरते आहे. म्हणूनच अमेरिकेचे गैटनर महाशय मागील महिन्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या आय.एम.एफ च्या बैठकीत जर्मनीवर ग्रीसला आर्थिक मदत पुरवण्यास दबाव टाकु पाहत होते. आला भेटीला ,धरला वेशीला अशी झालेली गत जर्मनी ने कशीबशी निभावली. जी२० च्या नोव्हेंबर महिन्यातील बैठकी पर्यंत नक्की काही तरी निर्णय घेऊ असे सांगून जर्मनी ने पळता पाय घेतला. 

जर्मनी ने नवेंबर महिन्यापर्यंत काहीच निर्णय घेतला नाही किंवा मदत पुरवण्यास साफ नकार दिला व ग्रीस ने खरेच दिवाळे घोषित केले तर जागतिक बाजारपेठा हादरतील जरूर. पण सर्वदूर विनाश होईल असे म्हणणे जरा आक्रस्ताळेपणाचे आहे असे म्हणावे लागेल. १९९८मध्ये रशिया सारखा देश दिवाळे घोषित करेल असे कुणाला स्वप्नात ही वाटले नव्हते. तेंव्हा सुद्धा रशिया ने दिवाळी घोषित केले तर ते आपली अण्वस्त्र दहशतवाद्यांना विकतील किंवा अण्वस्त्रांचा स्वतःच वापर करतील अशी बरीच भीतीची भुते उठावण्यात आली होती. रशिया ने दिवाळी घोषित केले आपले चलन जागतिक बाजारपेठेत घसरवले आणि त्याने वाढणार्‍या निर्यातीच्या जोरावर पुन्हा एकदा सबळ बनले. अगदी १० वर्षापूर्वी अर्जेंटीनाने दिवाळे घोषित केले. तेंव्हा अर्जेंटीना चे कर्ज अख्या ‘ इमर्जिंग मार्केट्स ’ च्या देशांच्या कर्जाच्या २५% होते. २००१ मध्ये इंटरनेटबबल नंतर ची आर्थिक मन्दी चालू होती. अर्जेंटीनाने अशा नाजूक काळात दिवाळे घोषित केल्यास जणू महापूर येऊन जग बुडतीला लागले अशी भीती तेंव्हा ही दाखवण्यात आली होती. पण आज रशिया सारखाच अर्जेंटीना देश सुद्धा सबळ राष्ट्र म्हणून उभा आहे. 

यूरोशी निगडीत असल्याने चलन कमी करून निर्याती वर भर देऊन कर्ज कमी करण्याचा मार्ग ग्रीस साठी बंद आहे. सरकारी खर्चात कपात व सरकारी कर्मचारांच्या पगारात कपात असे काहीसे मार्ग त्याला उपलब्ध आहेत. पण दिवाळे घोषित केल्यास ,ग्रीस यूरो झोनच्या बाहेर पडून त्यांचे पूर्वीचे चलन आणू शकतो. मग ते चलन जागतिक बाजारात घसरावून निर्यातीची चक्रे जोमात फिरवू शकतो. निर्यातीची सुरवात शेजारच्या यूरो झोन मंडळींपासून सुरू करून डोईजड कर्जात कपात करू शकतो. अर्थात म्हणे सोपे व करणे कठीण. १९९७ला इंडोनेशिया थाईलँड वगैरे देशांना जसे जबरदस्त आर्थिक चटक्यांन मधून जावे लागले तसे हाल ग्रीसचे पण होऊ शकतात. पण हे करणे जरुरीचे झाले आहे. 

दिवाळी दसरा हात पाय पसरा चे धोरण च ग्रीस च्या आताच्या परिस्थितीला बहुतांश कारणीभूत आहे. आता त्याला दिवाळे घोषित करण्यास परवानगी देऊन होणार्‍या परिणामांना एकदाचे सामोरेजाणे सर्वांच्याच हिताचे आहे.