Wednesday, September 7, 2011

वॉल स्ट्रीटवरचा शिमगा थांबणार कधी - 4 Nov 2008, 1831 hrs IST

सध्या जगभर सर्वत्र मंदीचे वारे वाहताहेत. अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्याच्या निघालेल्या दिवाळ्यानंतर जगभर पसरलेले हे लोण थांबायचे नाव घेताना दिसत नाही. मंदीचा हा फेरा कधी थांबणार त्यात आणखी कितीजण भरडले जाणार ... याचा थेट वॉल स्ट्रीटवरून खास मटा ऑनलाइन साठी वेध घेताहेत अर्थतज्ज्ञ अमित रहाळकर.
.............................................

वॉल स्ट्रीटवर दिवाळीआधी मंदीचा शिमगा साजरा झाला तो अजूनही संपला नाही. त्याचे परिणाम जगभरातल्या बाजारावर होत असून सर्वत्र आर्थिक मंदीची बोंबाबोंब सुरू आहे. जागतिक आर्थिक मंदीची ही आगीचे चटके आपल्या घराला तर लागणार नाही ना अशी चिंता जगातल्या प्रत्येकाला लागलीय. पण ही मंदी टाळता येणे अशक्य असून, आपण फक्त ती आपल्याला कशी कमी शेकेल याची काळजी घेऊ शकतो.

आर्थिक जगातील उठणा-या सध्याच्या या वादळात अमेरिकेतील हाउसिंग सेक्टरचा फुगा फुटलेला दिसतो. त्याचं मूळ या आधीच्या टेक्नॉलॉजीच्या फुग्यात दिसेल. १९९३ मध्ये सायबरजगात नेटस्केप हा वेब ब्राउझर लाँच झाला आणि इंटरनेट सामान्य माणसापर्यंत पोहोचले. त्यानंतर सिलिकॉन वॅलीमध्ये दर आठवड्याला एक कंपनीजन्माला येऊ लागली आणि पाहता पाहता शेअर बाजारही वर जाऊ लागले.

१९९८ च्या एशिअन टायगर्स च्या लोच्यानंतर आणि Y2K ची तयारी म्हणून फेडरल बँकेचे गव्हर्नर अलॅन ग्रीनपीस यांनी केलेले बदल शेअर बाजाराला चांगलेच मानवले. जानेवारी २००० मध्ये शेअर बाजार ११७०० च्या शिखरावर गेला. पण जसे जसे लोकांना कळले की इंटरनेट कंपन्या नफ्यात नसून तोट्यात आहेत तसे शेअर बाजार घसरत गेले. त्यातच ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त झाले आणि शेअर बाजारही कोसळला.

टेक्नोलॉजीचा फुगा फुटला आणि अनेक कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केली. त्यातही ग्लोबल क्रोसिंग आणि कॉर्निंगसारख्या कंपन्या ऑप्टिकल फायबरच्या उत्पादनात आघाडीवर होत्या. २००० सालच्या सुमारास त्यांनी अटलांटिक महासागराच्या तळाशी फायबर ऑप्टिकचे जाळे विणून अमेरिकेला युरोप व आशिया खंडाशी जोडले होते. गंमत म्हणजे त्यामुळे २००२ च्या मंदीच्या काळातही टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट स्वस्त झाले. या संवादक्रांतीमुळे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात तेजीचे वारे वाहू लागले. यामुळे विकसनशील देशांमध्येही सधन माणसांची संख्या वाढू लागली.

त्याच सुमारास दोन घटना घडल्या. पहिली म्हणजे फेडरल बॅंकेने व्याजाचे दर कमी झाले. दुसरी असे फेनी आणि फेडल मॅक यांच्यावर अकाउंट्समध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाली. त्यामुळे त्यांचा गृहउद्योग क्षेत्रात गहाण व्यवहारांमधला वाटा ४० टक्क्यावरून ३ टक्क्यापर्यंत घसरला. त्यामुळे लोक गुंतवणुकीचे नवे मार्ग शोधू लागले आणि रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवू लागले.

टेक्नोलॉजी क्षेत्रातीव हा फुगा फुटल्यानंतर बॅंका नव्या धंद्यासाठी भुकेल्या होत्या. नवीन कर्जदारांचे कर्ज MBs, CDOs सारख्या उत्पादनाचा जन्म होऊ लागला. फेनी आणि फेडलची गहाण बाजारातील गुंतवणूक कमी झाल्याने त्याची जागा हेज फंड घेऊ लागले. त्यामुळे एक नवीन श्रुंखला जन्म घेऊ लागली. या श्रृंखलेमुळे लोकांना कर्ज देणा-या मॉर्टेज कंपन्या आपले कर्ज बॅंकांना विकू लागल्या.

बॅंका हे कर्ज हे हेज फंड ना विकू लागल्या. हेज फंड ते कर्ज गुंतवणूक संस्थांना विकण्यास सरुवात केली. त्यामुळे या कर्जाबाबत संगीतखुर्चीचा खेळ सुरू झाला. या सा-यामुळे बाजारातील मागणी वाढली आणि त्याचे निकष सोपे झाले. त्यामुळे कर्ज सहज आणि हवे तेवढे मिळू लागले. प्रत्येकजण आपापल्या फायद्याचा विचार करू लागला पण त्यामुळे भविष्यात काय वाढलेय याचा कोणीच विचार केला नाही.

हळूहळू या श्रुंखलेतले घटक वाढू लागले. काही वर्षातच त्यात विविध देशांच्या विविध फंड येऊ लागले. तशा आणखीही अनेक खेळाडूंचा समावेश झाला. त्याचा परिणाम शेअर बाजारावारही दिसू लागला आणि मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या सुमारास अमेरिकन शेअर बाजार १४ हजाराच्या पल्याड गेला.

खरे तर नियंत्रण संस्थेने या अखंड श्रुंखलेला ओळखून या कर्जांवर मर्यादा आणणे गरजेचे होते. परंतु सिक्युरिटायझेशनमुळे आणि सीडीएस इन्शुरन्समुळे बॅकेच्या पुस्तकावर फार थोडे कर्ज दिसत होते. त्यामुळे नियंत्रण संस्थांचे हात बांधले गेले. अशा वेळी रेग्युलेशनचे नियम बदलणे गरजेचे होते. पण फेडरल बँकेचे गव्हर्नर ग्रीनस्पॅन आणि रिपब्लिकन सरकाय हेच मुळे प्रो-मार्केट तत्त्वाचे असल्यामुळे ते नियम बदलले गेले नाही आणि असेटचा फुगा अधिकाधिक वाढू लागला.

अखेर हा फुगा फुटला... बेअर स्टेन्स या हेज फंजाने कुवतीपेक्षा जास्त कर्ज देऊ केले आणि ते बंद पडले. पत्त्यांचा हा मनोरा कोसळू लागला. बेअर स्टेन्स या वर्षी मार्च मध्ये तर लेहमनने सप्टेंबरमध्ये दिवाळे घोषित केले. कंट्रीवाइड या मॉर्टेज लेंडरला तसेच मेरिल लिंचला बँक ऑफ अमेरिकाने विकत घेतले. जगभर बॅंकिग सिस्टिमला धक्का पोहोचला.

हे वादळ अजून एक वर्ष तरी चालू राहिल. या साखळीत अनेक घटक होते आणि त्यामुळेच फार गुंता झाला. पण आता अर्थव्यवस्था थोडीशी सावरू लागली आहे. पण अजूनही नियमांमध्ये अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. तसेच नव्या अध्यक्षांचे काय धोरण असेल याकडे बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे.

भारताबाबत सांगायचे तर या दशकातील प्रगती ही मुख्यतः आयटीमुळे झाली. हे आयटी सेक्टरच अमेरिकन क्लायंट्स आणि बॅकिंगवर अवलंबून आहे. त्यमुळे मंदीच्या आगीची झळ आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. पण त्यात फार नुकसान होईल असे म्हणता येणार नाही.

त्यामुळे काय होईल, त्याची वाट पाहणेच आपल्या हाती आहे.... 



-अमित रहाळकर 
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3673415,prtpage-1.cms

No comments:

Post a Comment