Tuesday, September 27, 2011

ऑपरेशन ट्वीस्ट : अमेरिकेचा नवीन आर्थिक उपचार

>> अमित रहाळकर अमेरिका 

२००८ सेप्टेंबर मधे जे आर्थिक वादळ उठले त्याने पहिले न्यूयॉर्क मधील वॉल स्ट्रीट च्या बँकांचा कायपालट केला. आणि नंतर अमेरिकेच्या राजकारणाचा ही 'काया '- पालट केला ! वाचकांना आठवतच असेल की २००८ वर्ष अमेरिकेचे निवडणुकीचे वर्ष होते. दर चार वर्षांनी नोवेंबर होणार्‍या ह्या निवडणुकीमधे त्या वर्षीच्या सेप्टेंबर महिन्यापर्यंत मॅकेन महाशय पॉप्युलर पोल्स मधे आघाडीवर होते. बरे त्यात काही नवल नव्हते कारण त्यांचे प्रतिस्पर्धी ओबामा नावाचे एक कृष्णवर्णीय महाशय होते ! पण १५ सेप्टेंबर ला लेहमान ब्रदर्स बँकेने दिवाळे घोषित केले व त्यानंतर च्या काही दिवसात मॅकेन महांशयांनी अर्थशास्त्राबद्दील पाजळलेल्या प्रांजळ मतांनी त्यांनाच चटका दिला वा ओबंमणा थेट वाइटहाउस मधे प्रस्थापित करण्यात हातभार लावला ! 


त्या घडामोडींना ह्या महिन्यात ३ वर्षे होतील. गेल्या हजार एक दिवसात बर्‍याच भल्या बुर्या घटना घडल्या. बुर्या च जास्ती झाल्या म्हणा! जसे की ह्या आर्थिक झंझावाताने अखक्या जगाला व्यापणे. पण एक महत्वाची भली गोष्ट मात्र अशी की अमेरिका ठेचकाळात का होईना ह्या वादळात अजुन ही तग धरून उभी आहे. 

आणि ह्याचे श्रेय मुख्यत: अमेरिकेच्या सरकार ला जाते. 

जुलै २००८ मधे बुश सरकारने ने "हाउसिंग अँड ईकोनॉमिक रिकवरी एक्ट" अमलात आणला. पण तो काही फारसा जम धरू शकला नाही. मग सरकारने फॅनी मे आणि फ्रेडी मॅक संस्थांचा कब्जा घेतला. ह्या संस्था तेंव्हा अख्या मोर्टगेज मार्केट च्या ४० %भागाशी निगडीत होत्या आणि पाणी पीत होत्या. त्यांना डूबण्यापासुन सरकारने वाचवले नसते तर हल्लकल्लोळ उडाला असता. मग सप्टेंबर मधे ए आई जी नावाच्या इन्षुरेन्स कंपनी ला वाचावले. आणि शेवटी ऑक्टोबर दरम्यान "ट्रबल असेट रिलीफ प्रोग्रॅम" च्या अंतर्गत अख्या बँकिंग क्षेत्राला वाचवले. 


२००९ मधे ओबामा सरकारआल्या नंतर सुद्धा ही गाथा सुरुच राहिली. फेब्रुवरी २००९ मधे त्यांनी "अमेरिकन रिकवरी अँड रीईनवेस्टमेंट एक्ट" पास केला. त्यानंतर काहीं महिन्यातच कार इंडस्ट्री ला मदत पुरविल्या गेली. २०१० वा २०११ साली क्वांटिटेटिव ईज़िंग नावाचा उपचार केला गेला . हा उपचार म्हणजे गवर्नमेंट चे बॉन्ड्स फेडरल रिज़र्व विकत घेते . त्यामुळे अधिक पैसा चलनात येऊन पैसा पैश्याला वाढवून समाजाची सर्वोननती व्हावी अशी अपेक्षा असते. 

हे सारे उपचार म्हणजे पोटात दुखतय म्हणून संपूर्ण शरीरावर कीमो थेरपी चा भडिमार केल्या सारखे झाले. खर्या अपचनाचे मूळ तर बेबन्द बांधलेली विकलेली ,आणि आता टाळा-बंदी होऊन पडलेल्या घरांमधे आहे. आणि ते मूळ शाबूत आहे. ३० करोड आबादी च्या देशात १३ करोड च्या जवळपास घरे आहेत. म्हणजे अक्षरश: प्रत्येक २ माणसामागे जर एक घर एखादा समाज बांधत असेल तर होणारे अपचन सुद्धा नभुतोन भविष्यती च होणार ! 

आणि म्हणूनच सेप्टेंबर २१,२०११ ला फेडरल रिज़र्व ने ऑपरेशन ट्वीस्ट 'नावाच्या नवीन इंजेक्षन ची केलीली घोषणा हे ह्याच मुळाला उद्देशून आहे. ह्या प्रस्त्वाप्रमाणे फेडरल रिज़र्व ६ ३० वर्षांनी मेच्यूर होणारे बॉन्ड्स विकत घेईल वा ० ते ६ वर्षा मधील मेचुरिटी चे बॉन्ड्स विकेल. म्हणजे नजीकच्या भविष्यातील बॉन्ड्स चे व्याज आणि दूरच्या भविष्यातील बॉन्ड्स च्या व्याजाचा संबंध एका अर्थे ट्वीस्ट 'होईल. कारण बॉंड ची जितकी जास्ती मेचुरिटी तितकी जास्ती अनिश्चितता आणि तितकेच जास्ती व्याज साधारणतः असते. सरकारने अशा तर्हेने मोर्टगेज मार्केट्स मधले दूर भविष्यातील बॉन्ड्स जे सहसा ७ १५ वा ३० वर्षे मेचुरिटी असतात ,घेतल्यास त्या बॉन्ड्स वरचे व्याज कमी होईल. म्हणजे लोकांना ह्या कमी दारात घरे रीफाईनांस करणे फायद्याचे पडेल. एखाद्या साधारण घराचा पी एम आय़ चा वाटा मासिक आमदानी च्या एक तृतियांश असतो आणि त्या रकमेतील निम्मा वाटा हा या व्याजाचा असतो. म्हणजे रीफाईनांस केल्यास लोकांची मासिक पगारातील बचत वाढेल म्हणजे लोक तो पैसा दुसरीकडे खर्च करू पाहतील जेणेकरून अर्थ व्यवस्थेतील खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढेल पैसा पुन्हा एकदा अर्थ प्रणालीत खेळू लागेल व हळू हळू हे आर्थिक वादळ शमेल .... अशी आशा ! 

ही झालीअमेरिका स्वरुप रुग्णाची गाथा. आणि हा रुग्ण शाबूत असला तरी 'दवाखान्यातील रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. ग्रीस ला मागील वर्षी जर्मनी आणि फ्रॅन्स च्या डॉक्टरानी जीवनाचे बाळकडू देऊन कर्जापासून व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला होता. तर ह्या वर्षीच्या सुरवातिपसुन च त्याचे शेजारी पाजारी म्हणजे इटली स्पेन अ पोर्तुगाल मंडळी रुग्णालयात गर्दी करू पहाताहेत. आणि युरोपियन कमर्षिल बॅंक नावाच्या डॉक्टर ची फे फे उडत असतांनाच गेल्या काही दिवसांपासून ग्रीस पुन्हा एकदा सलाइन लावून घ्यायला दाराशी उभा आहे! 

अटलांटिक महासागराच्या अल्याड व पल्याड जमा होणारी रुग्णांची अशी ही गर्दी पाहता गुंतवणूकदार जागतिक बाजारपेठेतून पळता पाय घेतात आहेत आणि सर्वदूर स्टॉक मार्केट्स कोसळतात आहेत ह्यात नवल नाही. 


कुठल्याही जीवघेण्या रोगाचा निदान व्हायला सहसा वेळ लागतो . आणि अशा क्लिष्ट रोगावर दिलेले औषध पहिल्याच झटक्यात लागू पडेल ह्याची १०० खात्री अगदी डॉक्टर ला ही नसते. त्यामुळे आता फक्त भविष्यालाच ठाऊक की उपचारांच्या ह्या श्रुन्खलेतिल ऑपरेशन ट्विस्ट ह्या रुग्णला परत चालता फिरता करते की अजुनच लम्बा करते !



http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10104792.cms

Wednesday, September 7, 2011

वर्क हार्ड , पार्टी हार्ड" - एक जीवन शैली 25 Aug 2011, 1433 hrs IST

अमित रहाळकर अमेरिका 

आठवड्याचे ५ दिवस-रात्र एक करा आणि मग उरलेले दोन दिवस रिलॅक्स करा म्हणजे मौज करा खा-प्या आणि 'शॉपिंग करा अशी ही जीवन शैली. आजपर्यंत फक्त आयटी क्षेत्राला लागू होणारी पण आज हळूहळू करता इतर ही क्षेत्रांमध्ये पसरणारी अशी ही जीवनशैली.

ह्या जीवनशैलीची सुरवात टप्प्याटप्प्याने अमेरिकेतून गेल्या ६०-७० वर्षांमधे झाली. दुसर्‍या महायुद्धाच्या पूर्तीनंतर जेंव्हा अमेरिकेचे सैनिक जर्मनी पासून तर जपान पर्यंत तैनात व्हायला लागले तसे त्यांच्या आर्थिक प्रणालीचे व जीवनशैली चे प्रभुत्व फैलु लागले. अमेरिकेला जस जश्या जगभर बाजारपेठा मिळू लागल्या तसे त्यांच्या समाजाला अधिक कामाचे आधिकाधिक समृद्धीत रुपांतर करणे जमू लागले. समाज मोठाली स्वप्ने पाहु लागला. चंद्रावर मात केली गेली. रॉकेट व अंतराळ यंत्रे अवकाशात सोडण्यात आली. पूर्व किनारा ते पश्चिम किनारा रस्त्यांचे जाळे विणून झाले. काम केल्याने पैसा येतो व तो विराट भौतिक वस्तूंच्या निर्मितीत खर्च करता येतो यावर समाजाचा दृढ विश्वास बसू लागला. काम करा वस्तूंचे ऊतपादन करा संपूर्ण जगाला विका आणि मालामाल व्हा हा जणू गुरुमंत्र बनला आणि "वर्क हार्ड अर्न हार्ड" जीवनशैलीचा जन्म झाला. 

सर्व जगभरातून ह्या देशात पैसा येऊ लागला म्हटल्यावर समाजाची समृद्धी जोमाने वाढू लागली. पैसा नुसताच साचवून वाढत नसतो तर तो खर्च केल्याने समाजात खेळतो व हळूहळू सर्वांच्या च उन्नती ला हातभार लावतो अशी शिकवणुक बिंबवण्यात आली. मग बघता बघता एक सामान्य गिरणी कामगार सुद्धा आपले स्वतः चे एक घर घेऊ लागला. त्या घरात फ्रीज़ असावा टीवी असावा माइक्रो वेव असावा वातानुकुलित खोल्या असाव्यात छोटासा एक बगीचा असावा गाडी असावी म्हणून अधिकाधिक काम करून अधिकाधिक खर्च करू लागला. जितकी भौतिक गोष्टींची ही रेलचेल वाढू लागली तितका अधिकाधिक गोष्टींचा हव्यास अजुनच चाळवला गेला. आणि "वर्क हार्डस्पेंड हार्ड" जीवनशैली चा जन्म झाला . 

मग समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्ती ला परवडतील अशा वस्तू बनवण्याचा खटाटोप उत्पादन कर्त्यानी सुरू केला . आपलाच माल विकला जावा म्हणून " स्वस्त ,भरोसेमन्द व टिकाऊ" ह्या ब्रीदवाक्याची घोषणा जणू हर एक जण करू लागला. मग तो वीज विकणारा असो की संगणक विकणारा ! ह्या खटाटोपीत बर्‍याच गोष्टींचा आविष्कार ही झाला. नवनवीन कार्यक्षेत्रांचा जन्म झाला. समाजाची वस्तून बद्दलची ती वाढती गरज भागवायला मग बाह्य देश रांग लावू लागले. अमेरिकेच्या डॉलर चे जागतिक बाजार पेठेत प्रभुत्व असल्याने बाह्य राष्ट्रांनी बनवलेल्या ह्या वस्तू समाजाला स्वस्त पडू लागल्या. हळूहळू हा समाज मग अधिकाधिक वस्तूंची आयात करू लागला. आधी इलेक्ट्रॉनिक्स व कार सारख्या वस्तू जपान व कोरीया सारखे देश पूरवू लागले. पण काही वर्षातच चिन जर्मनी कॅनडा मेक्सिको भारत सारखे अनेक देश आणखीन बर्‍याच वस्तू अमेरिकेला निर्यात करू लागले. करता करता अमेरिका स्वतःच जगातील सर्वात मोठी ग्राहक व बझारपेठ बनली! आता कुठल्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे एक व्यसनच. हे व्यसन पुरवण्यास मग हा समाज सर्रास कर्ज काढू लागला व करता करता अगदी सरकार सुद्धा कर्ज बाजरी झाली. गंमत म्हणजे अमेरिकेचे जगात आज इतके वर्चस्व आहे की बाह्य देश आधी दिलेल्या कर्जा कडे डोळे झाक करून खुषाल आणखीन कर्ज देऊ करू लागले. आणि वर निर्यात केलेल्या वस्तू अजुन स्वस्त पडाव्यात म्हणून आपापल्या चलनांना डॉलर च्या तुलनेत आणखीन खाली नेऊ लागली. आज अमेरिकेच्या अंतर्गत उत्पादनात ७0% भाग हा ह्या समाजाने देवाण घेवाण केलेल्या गोष्टीनचा आहे. समाजाचे असे वस्तू उत्पादनावरून नूसत्या वस्तू उपभोगा कडे केंद्रित झालेले हे लक्ष म्हणजे " वर्क हार्ड पार्टी हार्ड" जीवनशैलीची सुरवात ! 

ह्या कालावधीत युरोप मधील ग्रीस इटली स्पेन पोर्तुगाल आइयर्लँड वगैरे राष्ट्रांनी अमेरिकेच्या ह्या जीवनशैलीने प्रेरित होऊन मात्र "पार्टी हार्ड" ह्याच प्रणालीचा मनापासून कित्ता गिरवला ! म्हणजे नुसतेच घे कर्ज आणि कर ऐश पण कामाची बोम्ब ! त्यांना वस्तू पुरवण्याच्या भानगडीत चीन जपान कोरीया वगैरे देशांनी फक्त "वर्क हार्ड" प्रणालीचा कित्ता गिरवला ! 

आज जागतिक मन्दी मागील एक प्रमुख कारण म्हणजे ही डोईजड झालेली कर्ज बाजारी आहे. अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूस ओढवलेली ही कंगालिकता जपान चीन भारत व अशा अनेक निर्यात कारी देशांना भोवते आहे. आता ह्यावर उपाय म्हणजे भारत व चीन मधील जनतेने "वर्क हार्ड स्पेंड हार्ड पार्टी हार्ड" ही जीवनशैली अंगवळणीस पाडणे. २०० करोड लोकांच्या ह्या महासमुदायाच्या इच्छा चाळवून त्या इच्छा पूर्ती च्या खटाटोपीत ह्या मंदीचे सावट आपोआपच उठावे म्हणून जागतिक पातळीवर प्रयत्न तरी जोमाने सुरू आहेत. गेल्या ५-६ वर्षात भारतातील बाझार पेठेत तुम्ही गाड्या फोन लॅपटॉप अश्या अनेक गोष्टींची लाट आलेली पाहातच आहात. आता त्याला अजुन ऊत येणार आहे असे समजा ! 

खूब काम करो खूब कमाओ और खूब चैन करो ह्या धोरणातील जो पर्यंत काम ह्या शब्दाचा आपल्याला विसर पडत नहीं तो पर्यंत भविष्यात भारताची अमेरिके सारखी उन्नती होण्याची आशा आहे पण जर नुसतेच मौजेमागे धाव घेतली तर युरोप राष्ट्रांसारखी अधोगती होण्यास फारसा वेळ लागणार नाही !



http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9732818.cms#write

अमेरिका उताणी, राजा भिकारी! 29 Jul 2011, 2033 hrs IST

अमेरिकेच्या बदलत्या अर्थनितीमुळे भविष्यात येणा-या संकटांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला लिहेलेले पत्र... 


राज मान्य राजश्री अमेरिका 

अरे काय ही तुमच्या राज्यातील अराजकता!
तुमच्या अर्थमंत्र्यांनी कर्जमर्यादा ओलांडायची घोषणा करुन आता दोन महिने झाले आहेत. अरे मे १६ ला केली होती ती घोषणा आता जुलै संपत आला. गेल्या दोन महिन्यातील दैनंदिन कारभारासाठी त्याने युक्ती करुन जमवलेली रक्क्म ही आता २ औगस्टला सम्पुष्टात येणार. आणि काय हे तुमच्या विरोधी पक्षाने चालवलेले थेर ! म्हणे करमुक्ती चालू ठेवा. अरे मोठमोठाल्या कंपनींकडून आणि तुमच्या राज्यातल्या जनेतेकडून जरा जास्त करवसुली केली तर येवढ काय बिघडलं 

गेल्या १० वर्षात हि कर्जमर्यादा १० वेळा वाढवण्यात आली आहे. आधी इंटरनेट चा बुडबुडा फुटला मग तुम्ही अफगाणिस्तानावर चढाई केलीत मग इराक वर केलीत ,मग सबप्राइममुळे तुमच्या आर्थिक व्यवस्थेला घुडग्यावर आणले. अशी अनेक कारणे आणि दर वेळेस तुम्ही आधिकाधिक कर्ज उचलत गेलात व हि कर्जमर्यादा वाढवत गेलात. अगदि सगळे मान्य. मग यावेळेस का ही नाटकं आम्हाला पटत आहे की पुढल्याववर्षी तुमच्या राज्यात निवडणुकांचे वार वाहणार आहेत आणि त्यासाठी विरोधी पक्षाची ही एक चाल आहे. पण अरे तुमच्या या अंतर्गत राजकारणामुळे आमच्यासारख्या बाह्यराष्ट्रावर परिणाम होतो त्याच काय 

तुमच्या १४ हजार ३०० अब्ज डौलर कर्जाचे एक तृतियांश घेणेकरी ही बाह्यराष्ट्रे आहेत. तुम्ही जर कर्जमर्यादा वाढवली नाहीत तर या राष्ट्राना तुमच्या दरवज्यावर रांग लावावी लागेल. बर रांग लावून फारसा उपाय नाही हे सर्वाना ठाउक आहे. कारण तुमचे अर्थमंत्री त्याना हव्या त्या घेणेदारांचेच पैसे परत करतील आणि बाकीच्यांना खुशाल रिकाम्या हाताने परत पाठवतील.

शेवटी जगच्या अर्थ व्यवस्थेचे राजे तुम्ही आणि ते तुमचे अर्थमंत्री. आता या भीतीने जर त्या राष्ट्रानी तुमचे कर्ज जागतीक बाजारात विकायला काढले तर महाकल्लोळ उठेल. खनिज तेलाचे भाव उतरतील. आमच्या सारख्या राष्ट्राला जिथे महागाईचा भस्मासूर ऊठला आहे फायदाच होईल. पण सोने चादी व बाकी धातू अजूनही महाग होतील त्याच काय 

बर, तुम्ही सर्व देणेकरांचे कर्ज परत करु म्हणाल, तर इतक्या कमी कालावधीत पैसा कुठुन जमा करणार आता करायचच झाला तर तुम्ही सरकारी कामगारांना मुक्त करू शकता उरलेल्या कामगाराच्या निवृत्ती जमेत काटकसर करु शकता सरकारी प्रकल्प ठप्प पाडू शकता. अगदी तुमच्या तिजोरीतील ७००० टन सोने सुद्धा विक्रीला काढू शकता. पण तसे काही ही करता तुमच्या राज्यातील शेअर बाजार ताबडतोब बसेल. मग मोठमोठाल्या कम्पन्या त्याची बचत वाढवण्याच्या खटाटोपीत अजून कामगाराना मुक्त करतील व अंतर्गत प्रकल्प बंद करतील. तसे होताच आमच्या राष्ट्रातील आयटी कम्पन्याच्या पोटावर थेट पाय येईल. त्याचा निम्मा नफा तर तुमच्या राष्ट्रावर अवलंबून आहे. आमच्या राष्ट्रातील बेरोजगारी वाढेल, आमचेही शेअर बाजार कोसळतील. बरे तुमच्या घेणेकरी राष्ट्रामध्ये चीन आणि जपान यांचाही निम्मा वाटा आहे. त्यांच्या जीवावर कु-हाड येईल ती वेगळीच.

थोडक्यात काय तर तुम्ही मुकाट्याने पुढील आठवड्यात ही कर्जमर्यादा वाढवणे तुमच्या आमच्या आणि इतर सगळ्यान्च्याच हिताचे आहे. तरी तुम्ही कामास लागावे ही विनती!

(भारतवासी) अमित रहाळकर


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-9411594,prtpage-1.cms

अमेरिकेचं- आज उधार कल नगद

अमित रहाळकर, अमेरिका

आज नगद कल उधार असे आपल्या दुकानांमधे आपण लिहिलेले पहातो. मात्र हा नियम देशांच्या अर्थशास्त्राला लागु पडत नाही.आंतराष्ट्रीय देवाणघेवाणात तर आज उधार कल नगद असेच ब्रीदवाक्य आचरणात असते.

अमेरिकेत गेल्या पन्नास वर्षात बरेच सामाजिक बदल घडून आले. जसे की सोशल सेक्युरिटी मेडिकेयर व मेडीकेड बेरोजगारीचा भत्ता गरिबांना मोफत अन्न वगैरे. ह्या योजनांमुळे समाजातल्या निवृत्त आजारी लोकांना वृद्ध लोकांना बेरोजगार लोकांना सरकार तर्फे मदतीचा हात पुढे केला गेला. मात्र त्यासाठी लागणारा खर्च कर्ज ऊभारून पुरवण्यात आला. जसजशी समाजाची समृद्धी वाढू लागली लोकसंख्या वाढू लागली तसा तसा हा खर्च डोईजड होऊ लागला. इतका की ह्या योजनांचा मासिक खर्च आज १२० अब्ज डॉलर्स होऊन बसला आहे. यामध्ये सारकारी कामगारांचा पगार (१२ अब्ज) बॉन्ड्स वरचे देऊ व्याज (२९ अब्ज) सैन्याचा पगार (३ अब्ज) असे अनेक "चिल्लर" खर्च जमा केल्यास ती रक्कम ३०० अब्ज डॉलर्स च्या घरात जाऊन पोचते. मात्र सरकारची मासिक कमाई निव्वळ १७० अब्ज डॉलर्स च्या घरात आहे. आता ही १००-१२५ अब्ज डॉलर्स ची कमी भरायची कुठून तर कर्ज ऊचलून ...आज उधार कल नगद !

ती उधारी आज १४ हजार ३०० अब्ज डॉलर्स ची होऊन बसली आहे.आता हा राज्य कारभार असाच चालू ठेवणे एका गोष्टीवर अवलंबुन आहे. एक तर कर्ज मर्यादा कागदोपत्री वाढवून असेच सरकारने कर्ज उचलत राहणे किंवा सरकारच्या या डोईजड खर्चात कपात करणे. सध्या चाललेल्या वादात रिपब्लिकन पक्षाचे म्हणणे आहे की सरकारने दोन्ही गोष्टी एकाच वेळी कराव्यात ! त्यांच्या गेल्या शुक्रवारी लोकसभेत मंजूर केलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की ओबामा सरकारने जर १००० अब्ज खर्चात कपात केली तरच सरकारला तितक्याच रक्कमेने कर्जमर्यादा वाढवण्यास संमती मिळेल .परंतु सरकारला दर महिन्याला १००-१२५ अब्ज डॉलर्सचे कर्ज उचलणे भाग पडत असल्याने पुढील १०-१२ महिन्यातच त्यांना सिनेटकडे कर्जमर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यास हात पसरणे भाग पडेल व पुढील वर्ष निवडणुकीचे असल्याकारणाने ओबामा सरकारला ते घातक ठरेल. आणि म्हणूनच ओबामा सरकारने या प्रस्तावाला आम्ही सिनेटमध्ये चीत करू अशी घोषणा केली आहे. डेमॉक्रेटिक पक्षाप्रती योजना जी ते सिनेटमध्ये बहुमत असल्याकारणाने तिथे प्रस्तुत करणार आहेत ती सरकारी खर्चात २०००-३००० अब्ज डॉलर्स ची कपात करून कर्जमर्यादा तितक्याच रकमेने वाढवण्याचे सुचवते. आता नेमकी कुठल्या खर्चात कपात करावी व एकंदरीत कर वसूली वाढवावी की नाही याचा गुंता गेले कित्येक दिवस सुटत नव्हता. मात्र रविवारी संध्याकाळी ओबामांनी घोषणा केली की वाटाघाटींनंतर रिपब्लिकन पक्षाने आणि डेमॉक्रॅटिक पक्षाने एक तडजोडीच्या योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. सोमवारी संध्याकाळी ती योजना सिनेटमध्ये मंजूरही झाली आणि आता मंगळवारी तिला सिनेटमध्ये प्रस्तुत करणार आहेत.

पण एस अँड पी नावाच्या रेटिंग्स संस्थेने आधीच जाहीर केले आहे की जर खर्च कपातीचा चा हा आकडा अस्तित्वात ४००० अब्ज डॉलर्स दिसला नाही तर ती अमेरिकेचे रेटिंग ट्रिपल अ वरुन खाली आणेल. असे झाल्यास त्याचा परिणाम जगभरातील बाजारांवर होईल. लोक सोन्या-चांदी कडे वळू लागतील. भारतात सोन्याचा भाव २५००० रुपये प्रती तोळा जाउ संभवतो. भारतातील शेअर बाजाराला आणि आयटी कंपन्यांना झळ पोहचू शकते. बेरोजगारी वाढू शकते. आणि जर या काटकसरीच्या जाळ्यात गुंतून अमेरिकेने अफगाणिस्तानातून अवेळी माघार घेतली तर ते भारताला महागात पडू शकते. भारताच्या पूर्व सीमेवर चीनला तर उत्तर पश्चिम सीमेवर पाकिस्तानला ऊत येऊ शकतो. आणि यात भरीस भर म्हणजे जर पुढील वर्षी ग्रीसने आर्थिक मदती साठी पुन्हा एकदा हात पसरले तर अमेरिकेची ही आर्थिक कमजोरी अख्या जगाला महाग पडू शकते.

आज नगद कल उधार हे धोरण अमेरिकेने अमलात आणणे जरूरीचे आहे. त्यासाठी काही सामाजिक योजनांचा बळी देणेही जरूरीचे आहे. पण पुढील काही महिने या सोन्याच्या लंकेत होणा-या काटकसरीची झळ मात्र लंकावासींसकट तुम्हा आम्हालाही पोहचण्याचीही दाट शक्यता आहे.



http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-9452268,prtpage-1.cms

अमेरिकेतले नवे ओबामानॉमिक्स - 13 Nov 2008, 1603 hrs IST

चेंज... हा जादुई शब्द घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ओबामांनी येस वी कॅन म्हणत क्रांती घडवल
ी. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष म्हणून ओबामा जानेवारीमध्ये सूत्रं हाती घेतील. पण या नव्या सत्ताबदलांमुळे अमेरिकेच्या अर्थकारणातही नवे वारे वाहतील असे म्हटले जाते. आधीच आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलेल्या अमेरिकेला हे नवे वारे तारतील की बुडवतील हे येणारा काळच ठरवेल.

ओबामा काय काय करू शकतील याचा जगभरातले अंदाज अर्थतज्ज्ञ लावत आहेत. अमेरिकेतल्या अर्थव्यवस्थेला तारण्यासाठी ओबामानोमिक्सचे काय काय फंडे असू शकतात हे थेट वॉल स्ट्रीटवरून सांगताहेत अर्थतज्ज्ञ अमित रहाळकर ...

१. टॅक्स रिडक्शन 

अमेरिकाची अर्थव्यवस्था ही ६० टक्के कन्झ्युमर कंझप्शनवर चालते. अमेरिकाचा समान्य नागरिक मूळात खर्चिक स्वभावाचा आहे आणि जरा पैसा हातात खेळू लागला की तो तुम्हाला तो शॉपिंग करताना दिसेल. मात्र सध्याच्या झंझावातात बहुतेक लोक त्यांच्या खर्चावर आळा घालून आहेत. अशा वेळी सामन्य माणसाच्या हातातील रोख रक्कम वाढवण्यासाठी बराक ओबामा टॅक्स कट्स करू शकतील. या वार्षीच्या एप्रिल महिन्यात बुश सरकार ने १६ ८०० करोड डॉलरचे टॅक्स रिबेट्स चेक्स लोकांपर्यंत पोहचवले होते. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता. त्याला एक कारण म्हणजे सरकारने ठराव पास केल्यापासून ते लोकांपर्यंत चेक्स पोहचायला बराच अवधी लागला. मात्र ओबामा सरकारने टॅक्स ब्रॅकेट्समध्ये जर बदल केले तर ते बदल लोकांना ताबडतोब त्यांच्या मासिक पगारात दिसतील.

२. इंट्रेस्ट रेट्स कट्स 

ओबामा हा उपाय करू शकतील पण यात आता त्यात फारसा दम राहिलेला नाही. मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून बुश सरकारने तीन टक्क्यानी रेट्स कमी केले आहेत. गंमत म्हणजे बाकी देशानी याच दरम्यान व्याजाचा दर पाव टाक्यांनी वर नेला. परिणाम आपण पाहतच आहोत. अमेरिकन मार्केट युरोपिअन आणि एशियन मार्केटपेक्षा यामध्ये कमी पडले. बॅंक ओफ इंग्लंडने या आठवड्यात त्यांच्या व्याजाचा दर ४.५ % पासून ३% वर आणला. भारतीय रिझर्व बॅंकेनेसुद्धा दर कमी करून ५.५% वर आणला आहे. मात्र ओबामा सरकार सध्याच्या १% दराहून अजून फारसा दर खाली नेऊ शकतील असे वाटत नाही.

३. डायरेक्ट इन्वेस्टमेंट्स 

फ्रान्स सरकारने इतक्यातच आश्वासन दिलंय की ते तीन लाख अर्धवट बांधलेली घरे विकत घेणार आहेत. जर्मन सरकारने ३००० करोड डॉलर्सची रक्कम बाजूला ठेवली आहे. ही रक्कम सरकार टॅक्स ब्रेक्स व स्टेट-बॅक्ड लोन्ससाठी उपयोगात आणणार आहेत. बुश सरकारने गेल्या महिन्यात २५ हजार करोड डॉलर्सची रक्कम बाजारातील १० मोठ्या बॅंकांमध्ये गुंतावण्यात वापरली आहे. शिवाय १२ हजार करोड डॉलर्सची रक्कम AIG कंपनीमध्ये आणि २९०० करोड डॉलर बेआर स्टर्न्स बॅंकेला वाचवण्यास वापरली आहे. जनरल मोटेर्स व फोर्ड दिवाळे घोषित करण्याच्या ऊंबरठ्यावर ऊभे असल्याने ओबामा सरकार ह्या दोन कंपनीमध्येसुद्धा पैसा गुंतवतील असा कयास करण्यास हरकत नाही.

पण सूत्रे हातात घेण्यास ओबामांना अजून दोन महिने आहेत. या कालावधीत कॉंग्रेसचे एक अधिवेशन आहे. हे बुश सरकारच्या कालावधीतले शेवटचे अधिवेशन असल्याने सरकार कुठलेही निर्णायक पाऊल उचालण्यास मुळीच उत्सूक नाही. अशा परिस्थितीत ओबामाना बुश सरकारवर दबाव आणून वरीलपैकी काहीतरी करायला भाग पाडणे आवश्यक आहे. या प्रयत्नात ते कितपत यशस्वी होतील, हे कोडे लवकरच उलगडेल.


-अमित रहाळकर


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3737074,prtpage-1.cms

वॉल स्ट्रीटवरचा शिमगा थांबणार कधी - 4 Nov 2008, 1831 hrs IST

सध्या जगभर सर्वत्र मंदीचे वारे वाहताहेत. अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्याच्या निघालेल्या दिवाळ्यानंतर जगभर पसरलेले हे लोण थांबायचे नाव घेताना दिसत नाही. मंदीचा हा फेरा कधी थांबणार त्यात आणखी कितीजण भरडले जाणार ... याचा थेट वॉल स्ट्रीटवरून खास मटा ऑनलाइन साठी वेध घेताहेत अर्थतज्ज्ञ अमित रहाळकर.
.............................................

वॉल स्ट्रीटवर दिवाळीआधी मंदीचा शिमगा साजरा झाला तो अजूनही संपला नाही. त्याचे परिणाम जगभरातल्या बाजारावर होत असून सर्वत्र आर्थिक मंदीची बोंबाबोंब सुरू आहे. जागतिक आर्थिक मंदीची ही आगीचे चटके आपल्या घराला तर लागणार नाही ना अशी चिंता जगातल्या प्रत्येकाला लागलीय. पण ही मंदी टाळता येणे अशक्य असून, आपण फक्त ती आपल्याला कशी कमी शेकेल याची काळजी घेऊ शकतो.

आर्थिक जगातील उठणा-या सध्याच्या या वादळात अमेरिकेतील हाउसिंग सेक्टरचा फुगा फुटलेला दिसतो. त्याचं मूळ या आधीच्या टेक्नॉलॉजीच्या फुग्यात दिसेल. १९९३ मध्ये सायबरजगात नेटस्केप हा वेब ब्राउझर लाँच झाला आणि इंटरनेट सामान्य माणसापर्यंत पोहोचले. त्यानंतर सिलिकॉन वॅलीमध्ये दर आठवड्याला एक कंपनीजन्माला येऊ लागली आणि पाहता पाहता शेअर बाजारही वर जाऊ लागले.

१९९८ च्या एशिअन टायगर्स च्या लोच्यानंतर आणि Y2K ची तयारी म्हणून फेडरल बँकेचे गव्हर्नर अलॅन ग्रीनपीस यांनी केलेले बदल शेअर बाजाराला चांगलेच मानवले. जानेवारी २००० मध्ये शेअर बाजार ११७०० च्या शिखरावर गेला. पण जसे जसे लोकांना कळले की इंटरनेट कंपन्या नफ्यात नसून तोट्यात आहेत तसे शेअर बाजार घसरत गेले. त्यातच ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त झाले आणि शेअर बाजारही कोसळला.

टेक्नोलॉजीचा फुगा फुटला आणि अनेक कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केली. त्यातही ग्लोबल क्रोसिंग आणि कॉर्निंगसारख्या कंपन्या ऑप्टिकल फायबरच्या उत्पादनात आघाडीवर होत्या. २००० सालच्या सुमारास त्यांनी अटलांटिक महासागराच्या तळाशी फायबर ऑप्टिकचे जाळे विणून अमेरिकेला युरोप व आशिया खंडाशी जोडले होते. गंमत म्हणजे त्यामुळे २००२ च्या मंदीच्या काळातही टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट स्वस्त झाले. या संवादक्रांतीमुळे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात तेजीचे वारे वाहू लागले. यामुळे विकसनशील देशांमध्येही सधन माणसांची संख्या वाढू लागली.

त्याच सुमारास दोन घटना घडल्या. पहिली म्हणजे फेडरल बॅंकेने व्याजाचे दर कमी झाले. दुसरी असे फेनी आणि फेडल मॅक यांच्यावर अकाउंट्समध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाली. त्यामुळे त्यांचा गृहउद्योग क्षेत्रात गहाण व्यवहारांमधला वाटा ४० टक्क्यावरून ३ टक्क्यापर्यंत घसरला. त्यामुळे लोक गुंतवणुकीचे नवे मार्ग शोधू लागले आणि रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवू लागले.

टेक्नोलॉजी क्षेत्रातीव हा फुगा फुटल्यानंतर बॅंका नव्या धंद्यासाठी भुकेल्या होत्या. नवीन कर्जदारांचे कर्ज MBs, CDOs सारख्या उत्पादनाचा जन्म होऊ लागला. फेनी आणि फेडलची गहाण बाजारातील गुंतवणूक कमी झाल्याने त्याची जागा हेज फंड घेऊ लागले. त्यामुळे एक नवीन श्रुंखला जन्म घेऊ लागली. या श्रृंखलेमुळे लोकांना कर्ज देणा-या मॉर्टेज कंपन्या आपले कर्ज बॅंकांना विकू लागल्या.

बॅंका हे कर्ज हे हेज फंड ना विकू लागल्या. हेज फंड ते कर्ज गुंतवणूक संस्थांना विकण्यास सरुवात केली. त्यामुळे या कर्जाबाबत संगीतखुर्चीचा खेळ सुरू झाला. या सा-यामुळे बाजारातील मागणी वाढली आणि त्याचे निकष सोपे झाले. त्यामुळे कर्ज सहज आणि हवे तेवढे मिळू लागले. प्रत्येकजण आपापल्या फायद्याचा विचार करू लागला पण त्यामुळे भविष्यात काय वाढलेय याचा कोणीच विचार केला नाही.

हळूहळू या श्रुंखलेतले घटक वाढू लागले. काही वर्षातच त्यात विविध देशांच्या विविध फंड येऊ लागले. तशा आणखीही अनेक खेळाडूंचा समावेश झाला. त्याचा परिणाम शेअर बाजारावारही दिसू लागला आणि मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या सुमारास अमेरिकन शेअर बाजार १४ हजाराच्या पल्याड गेला.

खरे तर नियंत्रण संस्थेने या अखंड श्रुंखलेला ओळखून या कर्जांवर मर्यादा आणणे गरजेचे होते. परंतु सिक्युरिटायझेशनमुळे आणि सीडीएस इन्शुरन्समुळे बॅकेच्या पुस्तकावर फार थोडे कर्ज दिसत होते. त्यामुळे नियंत्रण संस्थांचे हात बांधले गेले. अशा वेळी रेग्युलेशनचे नियम बदलणे गरजेचे होते. पण फेडरल बँकेचे गव्हर्नर ग्रीनस्पॅन आणि रिपब्लिकन सरकाय हेच मुळे प्रो-मार्केट तत्त्वाचे असल्यामुळे ते नियम बदलले गेले नाही आणि असेटचा फुगा अधिकाधिक वाढू लागला.

अखेर हा फुगा फुटला... बेअर स्टेन्स या हेज फंजाने कुवतीपेक्षा जास्त कर्ज देऊ केले आणि ते बंद पडले. पत्त्यांचा हा मनोरा कोसळू लागला. बेअर स्टेन्स या वर्षी मार्च मध्ये तर लेहमनने सप्टेंबरमध्ये दिवाळे घोषित केले. कंट्रीवाइड या मॉर्टेज लेंडरला तसेच मेरिल लिंचला बँक ऑफ अमेरिकाने विकत घेतले. जगभर बॅंकिग सिस्टिमला धक्का पोहोचला.

हे वादळ अजून एक वर्ष तरी चालू राहिल. या साखळीत अनेक घटक होते आणि त्यामुळेच फार गुंता झाला. पण आता अर्थव्यवस्था थोडीशी सावरू लागली आहे. पण अजूनही नियमांमध्ये अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. तसेच नव्या अध्यक्षांचे काय धोरण असेल याकडे बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे.

भारताबाबत सांगायचे तर या दशकातील प्रगती ही मुख्यतः आयटीमुळे झाली. हे आयटी सेक्टरच अमेरिकन क्लायंट्स आणि बॅकिंगवर अवलंबून आहे. त्यमुळे मंदीच्या आगीची झळ आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. पण त्यात फार नुकसान होईल असे म्हणता येणार नाही.

त्यामुळे काय होईल, त्याची वाट पाहणेच आपल्या हाती आहे.... 



-अमित रहाळकर 
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3673415,prtpage-1.cms