- अमित रहाळकर, अमेरिका
स्टीव जॉब्स काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी जगभरातील तरण्या ताठ्यांना तर सोडाच पण प्रत्येक शिशु विहरालासुद्धा
स्टीव जॉब्स काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी जगभरातील तरण्या ताठ्यांना तर सोडाच पण प्रत्येक शिशु विहरालासुद्धा
आता पर्यंत ज्ञात झाली असेल! तसेच अमेरिकेतील जॉब्स मार्केट मधील जॉब्स गेल्याची बातमी सुद्धा संपूर्ण जगाला ठाऊक आहे!
गेल्या दशकात अमेरिकेबाहेरील जीवन प्रणालीचे ही केंद्रस्थान म्हणजे कम्प्युटर्स होते आहे हे तर आपण सगळेच अनुभवतो आहोत. दिवसेंदिवसस गतिमान होत जाणार्या या जीवनात फूरसत मिळाली की विरंगुळा म्हणून चित्रपट बघणे किंवा आप्तेष्टांशी वरचे वर फोनवर बोलणे हा सुद्धा आज या जीवनाचा एक पैलू झाला आहे. बाजारात कम्प्युटर्सची, चित्रपटांची आणि फोनची रेलचेल आहे. पण या तिन्ही गोष्टी बनवणारी एकच कंपनी आहे. आणि ती म्हणजे एप्पल. या तिन्ही माध्यमात शिरून जॉब्स महाशयांनी आपल्या उत्तम उपकरणांद्वारे आपल्या व्यवहारी आणि खाजगी आयुष्यात नुसता शिरकावच नाही केला तर गेल्या काही वर्षात ऐस पैस फत्कल मारुन बसले ! आणि म्हणूनच त्यांच्या निधनाचे पडसाद जगभर उमटल्याचे नवल नाही. टेक्नॉलॉजीच्या मंचावर पुढला अंक कुठला येणार आहे हे अचूक ओळखून तो अंक उपभोगण्यास त्यांनी आए-म्याक, आय-पॉड, आय-फोन, आणि आय-पॅड सारखी उपकरणे बनवली. मोहन रूप, उत्कृष्ट दर्जा, भरोसेमन्द, अग्रेसर इंजिनियरिंगनी ओतप्रोत, आणि महाग असलेल्या या उपकरणांनी लोकांना भुरळ पाडली. इतकी की त्यातील त्रूटीकडे दुर्लक्ष करून, खिशाला चीमटा काढून, लोकांनी त्या गोष्टी विकत घेतल्या.
अमेरिकेच्या दुसर्या जॉब्स , म्हणजे जॉब्स मार्केटमध्ये, अशाच काहीशा छटा आढळतात ! कंप्यूटर , फोन, चित्रपट अशा निर्मितीची क्षेत्रे तर सोडाच पण हे जॉब्स मार्केट बाकी अनेक व्यवसायक्षेत्रांमध्ये सुद्धा अग्रेसर आहे. मग ती गवत कापण्याशी निगडीत क्षेत्रे असोत किव्हा अवकाशात यंत्रे सोडणारी क्षेत्रे असोत. इंटरनेटवर हा जो तुम्ही लेख वाचता आहात त्या इंटरनेटची सर्वदूर पोचसुद्धा याच जॉब्स मार्केट मुळे शक्य झाली आहे ! तसेच बाकी अनेक क्षेत्रांच्या आघाडीवरील पुढील पाऊल ही इथेच टाकले जाते. अमेरिकेबाहेर सुद्धा शोध लागतात, लोक अंतराळात यंत्रे सोडतात , गाड्या बनवतात आणि चालवतातही. पण जसे एखादे गाणे आय-पॉड ऐकण्यात एक वेगळ्याच प्रतिष्ठेची आणि मौजेची बाब आहे, तसे अमेरिकेच्या जॉब्स मार्केटचा हिस्सा बनून त्याच गोष्टींच्या उत्पादनात किंवा उपभोगात काही वेगळीच मजा आहे. असा समजेचा पगडा तरी जगभर आहे ! म्हणूनच या जॉब्स मार्केट्सच्या निधनाच्या अफवा जगभर पसरतात आणि लोक भय विस्मितततेने त्या ऐकतात.
व्यवहारी आयुष्यात स्टीव जॉब्सने काळजी घेतली की लोकांची नजर त्यांच्या पलीकडे जाऊ नये. बाहेर च्या जगावर स्टीव जॉब्स म्हणजे अॅप्पल कंपनी आणि अॅप्पल कंपनी म्हणजे स्टीव जॉब्स हे समीकरण त्यांनी बिंबवले. त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या खाली काम करणार्या लोकांकडून त्यांच्या बद्दल फारशी स्तुतीसुमने उधळलेली ऐकिवात नाहीत. तसेच त्यांच्या खाजगी जीवनातील ज्या काही गोष्टी ज्ञात आहेत त्या मेणबत्त्या जाळून एका संताच्याच्या निधनाला साजेसा शोक प्रगट करण्यायुक्त नक्कीच वाटत नाहीत. जसे की त्यांचा मित्र आणि धंद्यातील जोडीदाराला अटारी कंपनीने दिलेला ७५०० डॉलर्सचा बोनस फक्त ७०० डॉलर्सच मिळाला असे सांगून त्यातलाही निम्मा वाटा ढापणे. नंतर १९७८ साली लग्नाबाहेरील संबंधा पासून झालेल्या मुलीचा तब्बल २ वर्षे अस्वीकार करणे. वयाच्या २५ व्या वर्षी १०० मिलियन डॉलर्स कमावले असतांना किंवा निधना आधी त्यांच्या कडे ४ बिलियन डॉलर्स असतांना, सामाजिक कारणांसाठी बिल गेट्स सारखे पैसे देऊ करण्यास साफ नकार देणे. अशी गुण संपन्नता असलेल्याच्या जाणीवेनी की काय पण त्यांनी १९८० च्या दशका नंतर आपले खाजगी जीवन सदैव गुप्त राहील याची अतोनात काळजी घेतली. तरीही निधानानंतर लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या पैलूंकडे डोळेझाक करून जगभर हळहळ व्यक्त केली. अगदी आपल्या अण्णा हजारे यांनी स्टीव जॉब्सने त्यांच्या आंदोलनात मदत केल्याचे मत दिले. आता कोणी तरी महागडा आय-पॅड घेऊन अण्णाना दिला, आणि फेसबुक, ट्विटर वर्गैरे माध्यमातून पसरलेल्या बातम्या त्यांनी त्या आय-पॅडवर वाचल्या. यात स्टीव जॉब्सनी आंदोलनात कशी मदत केली याचे खुद्द जॉब्सना ही कोडे पडले असते तर नवल नव्हते! शेवटी काय तर दैनंदिन जीवनाशी निगडीत व उपयुक्त अशा अॅप्पलच्या उपकरणांच्या निर्मितीच्या तराजूतच लोकांनी स्टीव जॉब्स चे जीवन तोलले. आणि म्हणूनच त्यांच्या व्यावहारिक कर्माचे पारडे सदैव भारी राहीले.
अमेरिकेच्या दूसर्या जॉब्स, म्हणजे जॉब्स मार्केट मधे, सुद्धा असे पैलू आढळून येतात! या जॉब्स मार्केट चे खाजगी जीवन लोभसवाणे नाही. त्याच्यात किती अनिश्चितता आहे व दसरा-दिवाळी विसरून लोकांना अहोरात्र काम काम करावयास कसे भाग पाडते हे त्याचा हिस्सा झाल्यावर जवळून अनुभवास मिळते . या जॉब्स मार्केटमधील वर्किंग अवर्स आज जगात सर्वात जास्त आहेत. जरी आठवड्यातील ५ दिवसच वर्किंग डेज़ समजल्या जातात, फक्त ४० तास आठवड्यात काम करणारी मंडळी कमीच आहेत. तसेच इथे जगातील सर्वात कमी पेड वेकेशन व पेड हॉलिडेज़चे प्रमाण आहे. आणि वरुन लोक त्याही सुट्ट्या पूर्ण संपवत नाहीत. खाजगी जीवनात त्यामुळे स्ट्रेसचे प्रमाण बरेच आहे आणि शारीरिक स्थूलता, मधुमेह, हृदयरोग अशा बराच आजारांनी लोकांना ग्रासला आहे. आणि तरी याकडे खुशाल दुर्लक्ष करून आपले देशवासीय तर सोडाच पण इतर राष्ट्रांमधले ही लोक एल-1, एच-1 वगैरे वीसांसाठी तडफड करतात ! त्याचे कारण म्हणजे या जॉब्स मार्केटच्या निर्मित्या. जी.ई., इंटेल, मायक्रोसॉफ्ट, वॉर्नर ब्रदर्स, गुगल, बोईंग, मोटोरोला, सिटी-बॅंक, फोर्ड अशा कंपन्या याच जॉब मार्केट्समधे जन्मल्या आहेत. आणि या कंपन्यांच्या विविध वस्तू आज जगभरातील लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या पैलूशी निगडीत झाल्या आहेत.
स्टीव जॉब्स जसे मागील काही वर्षे कॅन्सर ने ग्रासित होते तसेच हे जॉब्स मार्केट ही गेले काहीं वर्षे रुग्ण शय्येवर खीळून आहे. पॅनक्रीयाजच्या ऑपरेशन नंतर व पुढे लिवरच्या ट्रान्सप्लँटच्या ऑपरेशन ने जशी स्टीव जॉब्सच्या आयुष्याची मशाल धगधगती ठेवली, तशीच क्वांटिटेटिव ईज़िंग , टार्प अशा विविध उपचारांनी अमेरिकेच्या सरकारने या जॉब्स मार्केटचा बेरोजगारीचा आकडा १० % च्या खाली ठेवून त्याला कसेबसे जीवंत ठेवले आहे. पण आता याहून खाली हा आकडा आणणे जरूरीचे झालेले आहे. पुढल्या वर्षीच्या निवडणुकीचे वारे वारे सुरू झाले आहेतच . म्हणून सगळ्यांच्या ध्यानी मनी हे जॉब्स मार्केट आहे पाहूनच ओबामा महाशयांनी गेल्या महिन्यात ४४७ बिलियन डॉलर्स च्या अजुन एक ‘ इंजेक्शन ’ ची घोषणा केली होती. मात्र मागील बुधवार सेनेटमधे तो प्रस्ताव पराजीत झाला ही बाब चिंता जनक आहे.
स्टीव जॉब्स ना तर कोणी काळाच्या पडद्यामागून आणू शकत नाहीं. पण त्यांनी 'थिंक डिफरेंट' या ब्रीद वाक्याच्या जोरावर अॅप्पल कंपनी ला मात्र काळाच्या सावटा खालून बाहेर आणले होते. तर अशी आशा करू या की तेच ब्रीद वाक्य जॉब्स मार्केट्स च्या पुनरुत्थाना साठी साठी ओबामा महाशयांना कामी येईल आणि जॉब्स आणि जॉब्स चिरायु राहतील !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10365856.cms